जय श्री राम,
रामायणातील सर्वच पात्र महत्त्वपूर्ण आहेत. सर्वच पात्र काही ना काही शिकवणारी आहेत, सर्वच पात्र चमत्कारिक आहेत. त्यातील माझे आवडते पात्र म्हणजे 'शबरी' शबरी आपल्याला शिकवते की भक्ताने भगवंता प्रती इतके समर्पक असावे, की भक्ताने स्वतः चंदनासम झिजून भगवंताचे भाळ कौस्तुभ तीलकाने सजवावे. भक्ताने स्वतः धुपा प्रमाणे जळून भगवंतास दरवळ अर्पण करावा. तेव्हाच भक्त स्वतःस पुष्पाप्रमाणे वाहून देवून भगवंताचा होऊ शकतो.
शबरी शबर राजाची कन्या होती. ती राजकन्या होती, ऐश्वर्य संपन्न होती, शबर राजाची लाडकिही होती, शिक्षित होती, याच बरोबर शबरी अध्यात्मिक सुद्धा होती. या वरून हे सहज लक्षात येते की, शैक्षणिक, राजकीय तसेच इतर सर्व आधिकार आपल्या धर्माने सर्वांनाच दिलेले आहेत.
शबरी राजकन्या होती, तरीही तिच्या अध्यात्मिक ध्येयपूर्तीसाठी शबरी तिचे गुरू मातंग ऋषी यांच्या आश्रयास त्यांच्या आश्रमात राहिली. वनवासी झाली तसेच तीने वनवासी समाजाच्या उद्धार केला निसर्गावर अफाट प्रेम केले, तिथल्या वनवासींना सुद्धा तिने राम नामाची गोडी लावली. आपल्या अध्यात्मिक ध्येयपूर्ती साठी तिने मातंग ऋषींचे शिष्यत्व पत्करले होते. मग त्यांचाच उपदेश शिरोधार्य मानून आपले पूर्ण आयुष्य तिने श्री राम प्रतिक्षे मध्ये समर्पित करते ती अगदी स्वतःस वाहून देऊन, शबरी अगदी निस्वार्थ मनाने श्री रामाची भक्ती करीत राहते. तिच्या गुरूंनी केलेल्या उपदेशाला आपला जीवन मंत्र म्हणून जपते.
अखेर श्री राम शबरीच्या भेटीस तिच्या आश्रमात प्रवेशतात, तेव्हा त्यांचे आदरातिथ्य ती अगदी मनोभावे सेवाभावे करते,
त्यांच्या साठी घातलेल्या भक्ती पुष्पांच्या पायघड्यांवर जेव्हा श्री रामांची पदकमले उमलतात तेव्हा श्री राम प्रतिक्षेने कोरड्या पडलेल्या त्या शबरिच्या नयनजान्हवी तून सांडणारे आनंदाश्रू, ज्यांच्या रूपाने शबरीने स्वतःस श्री राम चरणी सांडले होते ते अगदी दहिवराप्रमाणे तेजोमय भासू लागतात. त्यानंतर शबरी त्याच गहीवरलेल्या अंतकरणाने शबरी आपल्या आरध्याचे पाय धुते, व श्री रामांना त्या वनातील सर्वश्रेष्ठ असणाऱ्या बोरांचा नैवद्य देऊन तृप्त करते. तसेच दख्खनच्या अंगद, हनुमंत, सुग्रीव यांना बरोबर घेतल्यास आपणाचा उद्धार होईल असे सुचवते. त्यानुसारच रावणाचा विनाश होतो, व राम राज्य स्थापन होते.
राजघराणे त्यागून, ऐश्वर्य त्यागून स्वतःस श्री राम प्रतीक्षा अग्नीत समर्पित करणे, आपल्या आरध्यास सर्वश्रेष्ठ तेच अर्पण करणे, हे साधारण न्हवेच. श्री रामांची प्रतीक्षा करताना शबरी श्री रामांच्या ओढीत बांधली गेलेली होती, ती श्री राम आगमनाच्या आतुरतेत बांधली गेलेली होती, तिने घातलेल्या भक्ती पुष्पांच्या पायघड्याही दीर्घकाळ श्री रामांच्या पदकमलांच्या स्पर्शाने धन्य होणार होत्या. तसेच तिकडे दक्षिणेस अंगद हनुमंत सुग्रीव इत्यादी वीर पराक्रम साहण्यासाठी व स्वतःस राम चरणी वाहण्यासाठी, व लंका मुक्ती साठी श्री राम प्रतीक्षेत बांधली गेली होती. या प्रतिक्षेस ही प्रतीक्षा असणाऱ्या क्षण शबरीच्या समर्पणा मुळे साध्य झाला आणि प्रतीक्षा बंधन श्री राम बाणा मुळे भेदले गेले, ते शबरी च्या समर्पणा मुळेच.
म्हणूनच शबरी श्रीरामाच्या मुकुटावरच्या भक्तीपुष्पा प्रमाणे आजही प्रफुल्लित आहे.