माझी कारसेवा

22 Jan 2024 08:55:23
"अरे बहन जी, आप तो सिवा के देस से आये है। प्रणाम लेना हमारा" हे उद्गार आत्तासुद्धा माझ्या कानामध्ये घुमत आहेत. 'ये कारसेवा करने आये है' या विचारां सोबत, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करणारे, सन्मान करणारे असे उद्गार मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. 1990 च्या कारसेवेच्या वेळी बांद्याच्या जेलमध्ये जेव्हा आम्हाला डांबून ठेवलं होतं, तेव्हा उत्तर प्रदेश मधले लोक आम्हाला खाणं-पिणं घेऊन भेटायला यायचे त्यावेळची ही घटना.
 
 Karseva Ayodhya
 
तेव्हा मी खेड तालुका भाजपाध्यक्ष होते. मुंबईला पोहोचल्यावर आम्ही सर्व कारसेवक ट्रेन ने अयोध्येला जायला एकत्रच निघालो तेव्हा काही अडचण नव्हती. पण माणिकपूर ला पोचल्यावर सर्व कारसेवकांना ट्रेन मधून उतरवून त्यांची झडती घेऊन सर्वांना अटक करण्यात आली. माझी रवानगी इतरांबरोबर तिथल्या तेंदू पत्तीच्या गोडाउन मध्ये झाली. त्या कोंदट जागी आम्ही रात्रभर होतो. तिथल्या दगडाच्या भिंती मध्ये एक पोकळी होती. काही कारसेवकांनी तिथले दगड सैल करून मोठं भोक पाडले आणि पहाटेच्या काळोखात आम्ही सुमारे वीस ते पंचवीस जण तिथून निसटलो. साधारण पंधरा वीस मिनिटांनी रेल्वे ट्रॅक वर पोचलो. ट्रॅकवर पोलीस होते. त्यांना चुकवत आम्ही थोडे लांब जाउन खाली बसत बसत, हळूच ट्रॅक ओलांडून स्टेशन मधून बाहेर आलो.
 
काळ्याकुट्ट काळोखात शेतातली ढेकळे तुडवीत आम्ही काही वेळाने जवळच्या माणिकपूर रेल्वे स्टेशनला पोहोचलो. स्टेशनला एक ट्रेन लागलेली होती. आणखी भरपूर कारसेवक तिथे होते. त्या ट्रेनने जाताना पोलिसांनी आम्हाला पुन्हा अटक केली आणि हमीरपुर या स्टेशनवर उतरवले आणि कोर्टात नेले. मी तिथल्या न्यायाधीशांना विचारले," आमच्याकडे रीतसर तिकीटे आहेत, कुठलेही शस्त्र किंवा अन्य काही आक्षेपार्ह गोष्ट नाही, आम्ही गुन्हा केलेला नाही मग आम्हाला अटक का केली ?" त्यावर थोडावेळ ते न्यायाधीश हतबल झाल्याचे दिसले. नंतर ते म्हणाले," दिल्लीहून वरिष्ठांचा आदेश आला आहे त्याप्रमाणे अटक केली आहे" त्यावर मी त्यांना सांगितले," सीआरपीसी किंवा आयपीसी मध्ये कुठेही वरिष्ठांच्या आदेशावरून अटक करता येते अशी प्रोव्हिजन नाही. मग तुम्ही कुठच्या प्रोव्हीजन खाली आम्हाला अटक केली?". ते अर्थातच काही बोलले नाहीत. आम्हाला तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला गेला. आम्हा सर्वांना बांद्याच्या जेलमध्ये टाकले. 
 
तिथेच असताना कोठारी बंधू घुमटी वर चढल्याचे समजले. आम्ही सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. मी व क्षेमा ताईनी हिंदी मधून भाषणे केली. लोकांनी आम्हाला अक्षरशः उचलून घेतले होते. अचानक कोठारी बंधूची बातमी आली. सर्व सुन्न झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना सोडून देणार असे सांगितले.
 
मी सकाळी लवकर उठून दूरवरच्या शासकीय रेस्ट हाउस वर एकटीच चालत गेले. तिथे वसुंधरा राजे, सुमित्रा ताई महाजन व आणखी कुणीतरी तिसऱ्या नेत्या होत्या. मी एकटीच आहे हे ऐकून त्यांनी तिथल्या पोलिसांना सांगून सतना स्टेशन वर सोडावयास सांगितले.
 
सतना रेल्वे स्टेशनवर तर प्रचंड गर्दी होती. या कालावधीत मला तिकडचा चार-पाच दिवसांपूर्वीचा एक पेपर वाचायला मिळाला. पेपरमध्ये एक बातमी पहिल्याच पानावर होती. 'कानपूर पोलीस द्वारा महाराष्ट्र से आये एडवोकेट कल्पलता भिडे का अपहरण'. अशा या संघर्षमय कारसेवेनंतर २१ दिवसांनी मी घरी परत आले.
 
श्रीराम मंदिर होणे म्हणजे देशाची अस्मिता जागृत करणे आहे. उत्तर प्रदेश मधल्या लोकांनी छत्रपतींचे ठेवलेले स्मरण व ही अस्मिता यांचे रुद्य नाते यावेळी उमजले.
 
कल्पलता भिडे, वकील, रत्नागिरी
 
Powered By Sangraha 9.0