।। श्री राम ।।
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः ।।
निळ्या कमळपाकळ्यांसारखे मोठे डोळे, ते तुडूंब भरलेल्या जलाशयासारखे सुंदर, दाट पापण्या, भव्य भालप्रदेश, कपाळावर उभं गंध, कानात सुवर्ण कुंडले, अतिसरळ नासिका, सुंदर लालसर ओठ, त्यात स्फटिकासमान सुंदर दंतपंक्ती, रक्तिमा पसरलेले गाल, सुंदर नाजुक हनुवटी, मदनालाही लाजवेल असे सुंदर प्रसन्न हास्य हे वर्णनही जिथे फिकेच पडावे असा माझा राम... त्याची तुलना मदनाशी करावी तर सौंदर्यात तोही मागेच रहातो असे रूप.. नुसताच रूपाची खाण नाही बरं माझा राम तर गुणांचीही खाण आहे. हजारो राक्षसांना एकसाथ मारण्याचे शरलाघव ज्याला अवगत आहे असा वीर, धनुर्धर रामचंद्र.. तोच माझा स्वामी श्री राम.. त्याचं गुणगान करतांना जिथे वेदही फिके पडले तिथे पामर जीवाची काय कथा..

कौसल्येचा राम, दशरथनंदन राम, सीतापती राम, लक्ष्मणाचा राम, हनुमंताचा राम आणि साऱ्या अयोध्येचा राम.. किती किती प्रेमधाग्यात विणलेला रामायणातला रामप्रेमाचा शेला! रामायणातला राम ही नुसती देवता नाही तो तर चराचरातील चैतन्य आहे, आनंदकंद आहे, करूणेचा समुद्र आहे. रामाकडे प्रेमाने जाणारा मग तो कोणीही असो राम त्याचे कल्याण करतोच आणि हो रागाने त्याच्याकडे जाणाऱ्यालाही मार्गावर आणतो ही रामाची कृपाच आहे. राम तुम्ही संकटात असतांना कायमच सहाय्य करतो आणि दुःख सोसायला बळ देतो. खरं तर रामाला कधिही संकटांबद्दल सांगू नये तो ती सहजच दूर करत असतो पण मनापासून सांगायचं झालं तर त्याच्याकडे " त्यालाच" मागावं. कारण तो एकदा "माझा" झाला की सर्व समस्यांना पूर्णविराम मिळतो. राम ही आपल्या हृदयात राहणारी देवता आहे, ती आपल्या प्रत्येक क्षणाचा साक्षिदार आहे. तीला आपण पृथ्वीवरचं क्षणभंगूर सूख मागून का दरिद्री रहायचं. त्यापेक्षा रामाकडे रामच मागावा. त्याची भक्ती, प्रेम सतत मिळत राहो म्हणून त्याच्याकडे याचना करत रहायची. राम ही रसनेचीही माधुरी आहे तशी मनाचीही बनावी. देहाने, मनाने, बुद्धीने राम आपलासा करावा. त्याच्यात व माझ्यात क्षणाचेही अंतर पडू नये अशी भक्ती घडावी. राम दुःखात माझा कायमच साथी होतो. दुःखाच्या वाळवंटातला निळा, शाश्वत झरा म्हणजे प्रभू श्री राम...
नीलमणी रामरायाची सुंदर, तेजस्वी, सुबक, सुहास्य मुर्ती नजरेसमोर आणून त्याला स्मरावे. त्याची मानसपूजा करावी. तो विलक्षण खूश होतो. राम प्रेममूर्ती, करूणामुर्ती, वात्सल्यमुर्ती. भक्ताला अपेक्षित ते यश देणारच पण आपण शक्यतो तू ठेवशिल तसे राहू देत अशीच प्रार्थना करावी. तो अधिक प्रसन्न होतो. रामाची पूजा शब्दांनी, फुलांनी, पानांनी, फळांनी, संगिताने कशाकशानेही तेव्हडी सुंदर होणार नाही जेव्हडी ती मानसपुजेने होईल. मनीमानसी राम दिसताच डोळ्यातून अश्रूधारा वहाव्यात हीच खरी मानसपूजा ! देव व भक्ताचं सख्य ! रामाला स्मरावे, रामासी भजावे स्मरावे तिन्हीत्रिकाळ असे मनापासून वाटावे.. ही रामेच्छाच!
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सौ. स्वरूपा कुलकर्णी