आज अक्षय तृतीया! भगीरथाने पृथ्वीवर गंगा आणली तो पवित्र दिवस! असे म्हटले जाते की, या दिवशी आपण जे सत्कार्य करू त्याचे अक्षय्य फळ आपणास मिळते! म्हणूनच आजच्या दिवशी अन्नदान- वस्त्रदान केले जाते, सोन्यासारख्या शुद्ध धातूची खरेदी केली जाते, विशेष कार्याचा आरंभ केला जातो! ही तिथी वर्षभरात सगळ्यात शुभ तिथी मानली जाते.या दिवशी शेतात नांगरणी करण्याची प्रथा काही भागात आहे.
शेताच्या मशागती इतकीच मनाची मशागत पण महत्वाची!
भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचा आत्मा श्रीराम!आजच्या या शुभ दिनी आवर्जून श्रीरामाच्या अक्षय्य गुणांचे चिंतन करूया।
कवी कुमार विश्वास लिहितात,
मानवता की खुली आँख के
सब सें सुंदर सपने राम।।
जिव्हा वाणी अर्थवती हो गयी
लगी जब जपने राम।।
श्रीराम अत्यंत अनाग्रही होते. योगवासिष्ठात म्हटले आहे, "अनाग्रही असणे हे स्थिर मतीचे पहिले लक्षण आहे" आपल्या गुरुचा हा उपदेश श्रीरामाने आपल्या आयुष्यात केंद्रस्थानी ठेवला. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाताना मला जे वाटते आहे तेच केवळ योग्य आणि तसेच घडले पाहिजे असा विचार रामाने कधीही समोर ठेवला नाही. सौम्यपणे समजावून सांगून पाहिले, मात्र कोठेही आत्यंतिक आग्रह धरला नाही. सीतेने रामसोबत वनामध्ये जाण्याचे ठरवले तेव्हादेखील रामाने सौम्यपणे सीतेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या प्रबळ इच्छेपुढे त्याने आपले मत बाजूला ठेवले.
भरताला राज्यावर बसायचे नव्हते, तर रामाच्या खडावा घेऊन त्या सिंहासनावर ठेवून राज्य करायचं होते. त्यालादेखील रामाने शांतपणे मान्यता दिली.
प्रत्येक जीवाची स्वतंत्र इच्छा आणि त्याच्या प्रारब्धाची गती यामध्ये आपण येऊ नये हा संदेश श्रीराम देतात.
रामराज्याचे नेहमी कौतुक केले जाते! त्याचा आदर्श सांगितला जातो! रामाच्या राजधानीचे नावच आयोध्या आहे! "युद्ध नाहीच आयोध्या!" असे तिचे वर्णन केले जाते. रामाचा शत्रु रावण हा रामाच्या राशीचा होता - चित्रा नक्षत्र तुळ रास! पण दोन राज्यांमध्ये किती फरक होता एक राज्य होते सौम्य शक्तीचे तर दुसरे राज्य होते सत्ताकेंद्रीत शक्तीचे!! रामराज्यात मान्यता होती की "मनुष्य मूलतः चांगला आहे.त्यामुळे राज्यव्यवस्था निर्मिती त्याच्यातील गुणांना वाव मिळेल अशा रचनेची असावी."
तर रावण समजत असे की
"व्यक्तीचा स्वभाव मूलतः दुष्ट आहे. त्यामुळे राजकीय व्यवस्था ही या स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी असावी. ती हुकूमशाही पद्धतीची असावी."
अयोध्येत संवेदनशील, जबाबदार राज्यव्यवस्था आणि तर लंकेत सत्ताकेंद्री हुकूमशाही राज्यव्यवस्था होती
मानवी विवेकबुद्धीचे, सौम्यशक्तीचे राज्य म्हणजे रामराज्य ! आणि शक्तीकेंद्रीत निर्दयी राज्यव्यवस्थेचे प्रतीक म्हणजे रावणाचे साम्राज्य ।
मूळ रामयणामध्ये अनेक कवींचे ओघ मिसळून गेलेत। इतके की आज ते वेगळे मानलेच जात नाहीत ।
उत्तर रामायण हे म. वाल्मिकीनी लिहिलेले नसून प्रक्षिप्त आहे. असे असले तरीही आज ते मूळ कथानकात मिसळून गेले आहे। त्यातील 'सीतात्याग' या विषयावर नेहमीच वाद होत असतात। रामाने त्याच्या स्वभावानुसार अत्यंत सौम्यपणे या ही प्रश्नाचा खरेतर निकाल लावलेला आहे। अश्वमेध यज्ञाच्या वेळी सोन्याची सीता करून घेऊन यज्ञातील सर्व धर्मकार्ये त्या मूर्तीच्या सोबतीने त्याने पार पाडली। राजा म्हणून त्याला आणखी एक विवाह करणे सहज शक्य होते। परंतु आपल्या मनामध्ये सीतेविषयी किंचितही किंतु नाही हे न बोलता रामाने प्रजेला दाखवून दिले। या दोघांचीही अबोल प्रीती, त्यातील कारुण्य हा रामायणाचा गाभा आहे!
रामाने कोणतेही चमत्कार केले नाहीत। त्याचे आयुष्य देखील समस्यांनी आणि दुःखाने भरलेले आहे। असे असताना हा नायक लोकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहे। या महाकाव्याचे नायिका सीता तर सतत हालअपेष्टा सहन करत गेली । तिला संसारिक आणि भौतिक सौख्य कधीच लाभले नाही। अशी व्यक्तिमत्वे विकासाच्या मार्गावर आदर्श कशामुळे म्हटली गेली असतील?? आजही आपण कोणाला विचारले आदर्श पुत्र कोण ? आदर्श बंधु कोण? आदर्श मित्र कोण? आदर्श पती कोण ? आदर्श पत्नी कोण? तर उत्तरादाखल रामायणातील पात्रांचीच अधिकतर नावे येतील। काय असावे या मागचे कारण?
विचार करा.. एक राजकुमार ज्याचा उद्या
राज्याभिषेक होणार आहे, तो डोळ्यासमोर आणा.. त्याला अचानक कळतं की आपल्याला १४ वर्षे वनात जायचे आहे। आपल्या वडिलांनी आपल्या वतीने आईला हे वचन दिले आहे। त्या प्रसंगाला त्याने दिलेला प्रतिसाद हा रामायणाचा केंद्रबिंदू आहे!! कोणत्याही परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो, त्यावर आपल्या जीवनाची दिशा अवलंबून असते। आंतरिक विकासाची ही परमावधी म्हणजेच विकासाची भारतीय संकल्पना आहे। या राजकुमाराची पत्नी, जी स्वतः राजकन्या आहे, ती सीता पण पतीसमवेत वनात गमन करते. त्याचा सावलीसारखा भाऊ लक्ष्मण सुद्धा वनात जाण्याचे ठरवतो ! मात्र त्याची पत्नी उर्मिला सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी अयोध्येत रहाते। या राजकुमाराचा धाकटा भाऊ भरत, परत आल्यानंतर रामाच्या पादुकांना सिंहासनावर ठेवून विश्वस्त म्हणून राज्य चालवतो!!
सीता लक्ष्मण हनुमान भरत या रामाच्या सोबतच्या अन्य व्यक्तिरेखा रामायणाला हृद्य बनवतात ।
हे निर्णय घेण्याचे किंवा या विपरित निर्णय घेण्याचे या सर्वांना स्वातंत्र्य होते। त्यांनी निवडलेल्या मार्गाला विकसित मनाचे निर्णय म्हणता येईल।
संघर्ष की मनःशांती.. यात प्रत्येकाने मनःशांती निवडली आहे! आणि त्यातही आत्मसन्मान न गमावता !
अत्यन्त कसोटीच्या प्रसंगात देखील, त्याला कसे तोंड द्यायचे हे आपल्याला ठरवता येते। मनुष्याचे मानसिक स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही। रामायण आपल्याला हे शिकवते, ते देखील एका सिद्धरस कथेतून!!
जीवनातील स्थायी मूल्यांना केंद्रीकृत करून महर्षी वाल्मिकींनी हि रामायण गाथा लिहिली। भारताच्या गृहस्थी जीवनाचे आदर्श या कथेमधून उभे केले। राजाच्या कर्तव्याची, निष्ठेची, प्रजापालन, सत्यपालनाची रामायण ही कसोटी ठरली। व्यक्तीचे आदर्श जीवन आणि सामाजिक जीवन याची कितीतरी उदाहरणे येथे ठायींठायी येतात। एकेक व्यक्तिरेखा आपल्याला जीवन जगतांना ते कशासाठी आणि कसे जगायचे हे शिकवून जाते।
ज्याला मर्यादापुरुषोत्तम असे म्हटले जाते तो श्रीराम या काव्याचा नायक आहे। अत्यंत कठीण प्रसंगांमध्ये देखील मनुष्य आपल्या चारित्र्याचे, जीवन मूल्यांचे रक्षण कशा प्रकारे करू शकतो याचे तो आदर्श उदाहरण आहे। रामाचे वर्णन करताना वाल्मिकींचे लेखणी माधुर्याने ओथंबली आहे। ते लिहितात, "श्रीराम नेहमीच शांतचित्त असतात। ते संभाषण करताना वाणीत कोमलता आणि मृदुता ठेवतात । दुसरा कितीही रुक्ष बोलला तरी ते मधुरच बोलतात । ते बलशाली आहेत। पण त्यांच्या बलाचे, पुरुषार्थाचे भय वाटत नाही। तर त्याविषयी विश्वास वाटतो।"
रामाचे चरित्र हे मानवतेच्या चरम अवस्थेचे वर्णन करणारे आहे। एक मनुष्य जो दैवी अवतार असला तरी, कोणत्याही चमत्काराशिवाय आयुष्य निर्माण कसे करतो हे रामायण सांगते।
वाल्मीकींच्या दृष्टीने चारित्र्य हीच मानवतेचे कसोटी आहे। चारित्र्याने जो मनुष्य परिपूर्ण आहे, त्याचे वर्णन हाच रामायणाचा मुख्य उद्देश आहे। चरित्रच मानवाला देवता म्हणून पुढे आणते।
आपल्या देशाच्या भावजीवनात आणि सांस्कृतिक जीवनात रामाच्या कथेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे । रामायण हे आपल्या देशात सगळ्यांना कथारूपाने माहीत असतेच । आदीकवी वाल्मिकींनी आपल्या अद्भुत प्रतिभेने रचलेले हे महाकाव्य म्हणजे जणू पुण्यवान गंगा प्रवाह आहे । ज्यामध्ये वाचक केवळ पवित्र होत नाही तर हृदयापासून आनंदित होतो ।
अशा सर्वांना माहीत असलेल्या रामकथेला भारतात पुनः पुन्हा का सांगितले जात असावे? काय कारणे असतील त्या मागे? या प्रश्नांवर विचार करताना एक उत्तर आपसूकच मनाच्या पटलावर उमटते ते म्हणजे, " रामकथा प्रत्येक सहृदय व्यक्तीला आकर्षित करणारी आहे" पण केवळ इतकेच कारण असेल का ?
यावर महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास यांनी असे म्हटले आहे की, "रामायण हे नुसते साधे काव्य नाही. जीवन विकसनाचे ते अंतिम टोक आहे. श्रीरामचंद्र हे सर्व परमोच्च गोष्टींचे प्रतीक म्हणून मानले गेले आहेत. वाल्मिकींचे राम हे कलियुगाचे उपास्य दैवत झाले आहेत."
जागर श्रीरामाचा या लेखन प्रकल्पाच्या निमित्ताने रामाच्या गुणांचे आपण चिंतन- मनन करूया. मेघासी अर्पण उदकांजली! आणोनिया समर्पिली!
डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.
कोल्हापूर
9421219859