माझे आई-वडील दोघेही ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतल्या कारसेवेत सहभागी झाले होते. आज माझे वडील हयात नाहीत. आता माझी आई ९२ वर्षांची आहे. तिला विचारून कारसेवेदरम्यानचे तिचे अनुभव मी शब्दबद्ध केले आहेत.
'कारसेवा' किंवा 'कारसेवक' हा शब्द तेव्हा फारसा कुणाला माहित नव्हता. 'कारसेवक' म्हणजे धार्मिक कार्यासाठी किंवा संस्थेसाठी निस्वार्थ आणि निःशुल्क सेवा देणारी व्यक्ती असा आहे. मला वाटतं ह्या 'कारसेवक' शब्दातच खूप मोठा अर्थ दडलेला आहे. निःस्वार्थीपणा आणि सेवाभावी वृत्ती असे गुण माणसात एका दिवसात किंवा थोडक्या दिवसात उदयास येत नसतात, तर अशी वृत्ती आयुष्यभर जोपासावी लागते.
सप्टेंबर १९९० मध्ये विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमीच्या जागेवर राम मंदिर पुनर्बाधणीसाठी आंदोलन सुरू केले होते. तेव्हा पासूनच 'जय श्रीराम' व 'मंदिर वही बनाएंगे' असे नारे सर्वत्र दुमदुमत होते. सर्व देशभक्त रामजन्मभूमीवर श्रीरामाचं मंदिर झालंच पाहिजे या ध्येयाने झपाटलेले होते. या आधी सुद्धा स्थानिक हिंदू बांधव, या जागेचा ताबा त्यांना मिळावा आणि त्या जागेवर मंदिर बांधण्याची परवानगी मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न करीत होते. ह्या चळवळीला बळ मिळावे म्हणून भाजपाचे नेते श्री. लालकृष्ण आडवाणी यांनी 'राम रथयात्रा' सुरू केली. मुलायमसिंह यादव हे त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
त्यानंतर जवळ जवळ दोन वर्षांनी म्हणजेच ६ डिसेंबर १९९२ रोजी विश्व हिंदू परिषदेने पुन्हा मंदिर उभारणीसाठी कार सेवेचे आयोजन केले.
माझे वडील नित्य नेमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असत. तिथल्या अनेकांनी या चळवळीत सहभागी होण्याचं ठरवलं होतं. माझ्या आई वडिलांनीही त्यांच्या बरोबर कारसेवेत सहभागी होण्याचे निश्चित केले. यापूर्वी कारसेवकांवर झालेले हल्ले माहिती असल्याने मी त्यांना विरोध करत होते. पण आईनी मला समजावलं की, आता आमचा प्रपंच पूर्ण झाला आहे. कौटुंबिक जबाबदारीतून आम्ही मुक्त झालो आहोत. तेव्हा देशासाठी काही करता आलं तर ते आमचं भाग्यच असेल.
५ डिसेंबर १९९२ रोजी लाखोंच्या संख्येने महिला व पुरूष कारसेवकां सोबत माझे आई-वडीलही अयोध्येत दाखल झाले. सबंध हिंदुस्थानातून कार सेवक तिथे जमले होते. कारसेवकांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. काहीही झालं तरी आज मशीद पाडायचीच या प्रेरणेने सर्व कारसेवक भारलेले होते.
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती या नेत्यांची तिथे भाषणे सुरू होती. 'मंदिर वही बनाएंगे' च्या भावनेने जमाव आधीच प्रेरीत झालेला होता. लोकांचा उद्रेक अनावर झाला आणि संतप्त जमावाने मशिदीच्या दिशेने आगेकूच केली. सुरक्षा कवच भेदून काही कारसेवक मशिदीच्या घुमटावर चढले. काहींनी मशिदीत प्रवेश केला. त्या सर्वांच्या प्रयत्नाने काही तासातच मशीद पाडली गेली. मशिदीच्या आत एका बाजूला छोट्या खाटेवर असलेल्या 'रामलल्लाला' मानवी साखळी तयार करून बाहेर आणण्यात आलं. त्या मानवी साखळीत माझी आई होती. 'रामलल्लाला' हातात घेतल्याचा क्षण तिच्यासाठी खूप खास आणि आनंददायी अनुभव होता. त्याच आवारात मग लगेच थोडीशी जागा साफ करून, छोटीशी झोपडी उभारली गेली. रामलल्लाच्या मूर्तीची पूजा करून तिथे तिची स्थापना केली. 'झोपडी' असं संबोधलं असलं तरी सर्वांच्या मनातलं तिचं स्थान हे देवालयाच्या ऊंचीचच होतं. गौरवशाली विजयानं कृतकृत्य झाल्याचं समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर त्यावेळी दिसत असल्याचं आईनी मला सांगितलं.
मशिदीच्या आधी तिथे मंदिराची रचना होती हे आता न्यायालयातही मान्य झालं आहे, आणि त्या जागी आता श्रीरामांचं भव्य मंदिर उभारलं जातंय ही खूप आनंदाची गोष्ट आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत, भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या उपस्थितीत, श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा अभुतपूर्व असा भव्य सोहळा संपन्न होणार आहे. ही घटना सर्व हिंदू देशबांधवांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.
कुठलेही मोठे कार्य घडतांना त्यात अनेकांचे हात लागलेले असतात. ती अजरामर घटना म्हणजे एक संघ शक्तीच असते. त्यातील पडद्यामागच्या कलाकारांची मेहनतही तितकीच मोलाची असते.
कारसेवा फलद्रुप होऊन राम मंदिर उभारणीचा क्षण याची देही याची डोळा अनुभवण्याचे भाग्य माझ्या आईला लाभणार आहे याचा तिला आणि मलाही आनंद झाला आहे. अशा निःस्वार्थी आणि सेवाभावी आई वडीलांचा या क्षणी मला खूप अभिमान वाटतो आहे.
जय श्रीराम
सौ. आरती अरविंद जोशी,
कोथरूड, पुणे.
आई- श्रीमती सुशीला प्रभाकर भिडे कोथरूड, पुणे
दिनांक १७/१२/२०२३
मो.नं. ९२२२३१५७९७