दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामेतु जनकात्मजा ।
पूरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनन्दनम् ।।
ज्याच्या उजव्याबाजूस शेषावतारी लक्ष्मण, डाव्या बाजूस लक्ष्मीस्वरूप सीता उभे आहेत; ज्याला रुद्राचा अंश पवनपुत्र हनुमान वंदन करतो आहे; अशा या रघुकुलाच्या उद्धारकर्त्याला, विश्वाच्या रक्षणकर्त्या व पालनकर्त्या श्रीविष्णूंच्या अवताराला म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांना माझा प्रणाम!
रामायण! या भरतभूचा जाज्वल्य इतिहास! या इतिहासाची साक्ष देणाऱ्या असंख्य खुणा संपूर्ण जगभर आढळतात. रामकथा आपल्याला आदर्शत्वाचा संस्कार देते. यातील पात्र आपल्याला आदर्श जीवन कसे जगावे याचा संदेश देतात.
या कथेचे नायक मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र यांचं व्यक्तीमत्त्व म्हणजे आदर्श पुत्र, शिष्य, पति, योद्धा, राज्यकर्ता या सर्व पैलूंचा उत्तम संगम ! पितृ आज्ञेचे पालन करून त्याने पितृऋणांची जाण ठेवली. रावणासोबतच्या युद्धाच्या सिद्धतेमध्ये श्रीरामांचे नेतृत्व, समाजातील सर्व घटकांना आपल्या कार्यात सहभागी करून घेण्याची वृत्ती या गुणांचे दर्शन घडते. रामचंद्रांचे हे गुण प्रत्येकाने आत्मसाथ करण्याजोगे आहेत. सध्या पालकांची मुलांविषयी तक्रार असते की ते त्यांची आज्ञा पाळत नाहीत. रामकथेचा संस्कार जर पोहचवला तर ही स्थिती नक्की बदलेल.
सीतेच्या जीवनातूनच रामाचे जीवन घडते. म्हणून जर राम घडवायचा असेल, तर आधी सीता घडवली पाहिजे! सीतामातेच्या धैर्य, चारित्र्य, सत्वशीलता, पतिनिष्ठा या गुणांचा प्रत्यय रामकथेतून येतो. संसारूपी रथाला पती आणि पत्नी ही दोन चाकं असतात. दोन्हीही चाकं नीट चालली तरच रथ सुरळीत चालू शकतो. श्रीरामांसोबत वनवास पत्करून सीतामातेने हाच संदेश दिला आहे. राजसुख आणि पती यांच्यातील एकाचीच निवड करण्याचा प्रसंग आल्यावर तिने
'संगे असता नाथा आपण
प्रासादहुनी प्रसन्न कानन ।।'
असे म्हणत वनवासी होऊ पाहणाऱ्या श्रीरामचंद्रांनाच निवडले व खऱ्या अर्थाने ती त्यांची अर्धांगिनी ठरली. 'सुख असो व दुःख एकमेकांच्या साथीनेच वैवाहिक जीवन व्यतीत करायचं असतं', असा संदेश देत ती प्रेमाचा अर्थ देखील सांगते. सीतामातेचा हा संदेश जर नीट समजून घेतला तर विवाहसंस्थेची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसण्यास मदत होईल.
रामायणातील लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही बंधुप्रेमाची उत्तम उदाहरणे आहेत. लक्ष्मणाने रामांच्या सोबत राहून त्यांचे रक्षण व सेवा केली. शुर्पणखेचा वध केला. भरताने रामांच्या आज्ञेनुसार राज्याचा सांभाळ करण्याचे ठरवले. सद्यस्थितीत घडणारी 'सुंदोपसुंदी' थांबवण्याचा उपाय म्हणजे ही रामकथा!
रामायणात प्रत्येकालाच शारीरिक, मानसिक, अथवा भावनिक कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कष्ट, दुःख रावणवधासाठी भोगावेच लागले. तू 'प्रियकामा' नाही तर 'श्रेयकामा' हो, ही पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून कैकयीने सर्वांच्या हिताचा विचार करूनच वर्तन केले. रावणवधासाठी रामाला वनवास घडवून आणला. वैयक्तिक मान, अपमान, प्रतिष्ठा, कीर्ति या गोष्टी मानवहितापेक्षा कधीही श्रेष्ठ नसतात, हे आपल्याला यातून समजतं. राज्यकर्त्यांनी उत्तम राज्यकारभारासाठी ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे.
तुम्ही कितीही विद्वान असतात आणि जर तुम्हाला तुमचे अवगुण व दुष्ट प्रवृत्तींना नियंत्रणात ठेवता येत नसेल, तर तुमची विद्वत्ता कस्पटासमान ठरते व सर्वनाश ओढावतो; हे 'रावण' आपल्यला शिकवतो.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता ।
स्त्रियांचा अनादर व त्यांना दिलेल्या यातना या मोठमोठी साम्राजे धुळीस मिळवण्यास कारणीभूत ठरतात हा विचार रामकथा देते.
समाजातील सज्जनांकडे सामर्थ्य, शक्ती असेल तरच दुष्ट प्रवृत्ती नियंत्रणात राहू शकतात, पराभूत होऊ शकतात; हे आपल्याला श्रीराम, हनुमान आणि लक्ष्मण शिकवतात.
रामकार्यासाठी सदैव तत्पर असणारा हनुमान सज्जनांनी उपासनापूर्वक 'बुद्धीमतांवरिष्ठं' व 'शक्तीमतांवरिष्ठं' होण्याची का आवश्यकता आहे? हे समजावतो. सीतेच्या शोधातील हनुमंताचे वर्तन कर्तव्यनिष्ठा, कर्तव्यदक्षता या गुणांचे दर्शन घडवते. 'मोहात अडकून कर्तव्य विसरू नका' असाही संदेश देते. 'कुठल्याही परिस्थितीत सत्याची बाजू सोडायची नाही' हा संदेश लंकादहनाचा प्रसंग देतो.
माता कौसल्या, माता सुमित्रा, धर्मात्मा राजा दशरथ, सुग्रीव, बिभीषण, जटायू, महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र व इतर ऋषीमुनी, शबरी, अहल्या या सर्वांचे रामकथेतले योगदान आपण सर्व जाणतोच.
रामायण हे आदर्श मनुष्यजीवनासाठी रचले गेलेले अत्यंत मार्गदर्शक काव्य आहे. 'हरी अनंत हरी कथा अनंता।' हे रामकथेच्या वर्णनविस्ताराला तंतोतंत लागू होत. मनुष्याच्या आचरणाचे होणारे परीणाम, आदर्श आचरणातून घडणारे आदर्श चारित्र्य या व अशा अनेक गोष्टींचे ज्ञान रामायण देते. म्हणूनच ते कायम काळानुरूपच आहे. असं काव्य रचणाऱ्या वाल्मिकी मुनींना शतशः नमन!
जय श्रीराम !
अदिती प्रशांत वैद्य, पुणे
संपर्क-८६०५७०६३०२
Email:aditivaidya888@gmail.com