परस्परांना भेटल्यावर राम-राम म्हणण्या पासून ते मनुष्याच्या अंत्य समया पर्यंत श्रीरामाचे नाव घेतले जाते. एखाद्याचे माणूसपण हरपले तर त्याच्यात काही राम उरला नाही असे म्हटल जात. याचाच अर्थ प्रभू श्रीरामचंद्र हे सर्व देशाला आदर्श प्रेरणादायी असे महान व्यक्तिमत्व आहेत.
६ डिसेंबर (१९९२) या दिवशी बाबरी ढाच्याच्या पतनाने भारतीय संस्कृतीवरील कलंक विराट हिंदू शक्तीने नेस्तनाबूत केला आणि ५ ऑगस्ट (२०२०) या दिवशी मुक्त झालेल्या श्रीरामजन्म भूमीवर प्रस्तावित भव्य श्रीराममंदिर निर्माणाचे भूमिपूजन झाले. म्हणूनच हे दोन्ही दिवस ऐतिहासिक दिवस म्हणावे लागतील.
सर्व भारत वर्षाला प्रेरणा देणारे असे श्रीरामांचे भव्य मंदिर प्रभू श्रीरामांच्या निर्वाणानंतर त्यांचे सुपुत्र लव आणि कुश यांच्या काळात निर्माण झाले. पण पुढे ते काळाच्या प्रवाहात नष्ट हि झाले. पुन्हा ते मंदिर एकविसशे वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्य यांनी उभारले.
सातव्या शतकापासून राक्षसी वृत्तीच्या टोळधाडी सुसंस्कृत असलेल्या या भारतभूमीवर अनेकदा आल्या येथील संपत्ती, परंपरा यांचा नाश केला. संस्कृतीची प्रतीके असलेल्या मंदिरांवर बीभत्सपणे हल्ले करून मूर्तीची विटंबना केली. प्रभू श्रीरामचंद्र यांचे जन्मस्थान असलेले भव्य मंदिर आक्रमकांनी उध्वस्त केल्यानंतर येथील हिंदू राजे सैन्य व प्रजेने त्यासाठी अविरत संघर्ष केला. बाबराच्या काळात मिरबाकीने तेथे मस्जिद उभारून हिंदू अस्मितेलाच आव्हान दिले. (इ.सन १५२८)
जय महंकाल, जय श्रीराम, बोलेसो निहाल, सतश्री अकाल, जय जय रघुवीर समर्थ अशा घोषणा देऊन विविध संप्रदायांनी, तमाम हिंदूंनी आक्रमकांचे हे आव्हान स्वीकारून रक्तरंजित हा संघर्ष केला. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या संदर्भात हे स्थान पुन्हा हिंदूंना सोपविण्याचा समझोता झाला होता. दुर्दैवाने हे स्वातंत्र्ययुद्ध ब्रिटिशांनी अमानुष क्रौर्याने दडपून टाकल्याने रामजन्मभूमी हिंदूंच्या ताब्यात आली नाही.
विशाल हिंदू संमेलनांच्या माध्यमातून शेवटी साधू-संत-धर्माचार्य यांनी १९८४ मध्ये स्थापन झालेल्या रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती द्वारे अत्यंत सनदशीर व लोकशाही पद्धतीने जनतेच्या भावना मांडणे सुरु केले. हिंदू जनजागृती प्रखर करण्यासाठी राम - जानकी रथयात्रा विविध प्रदेशातून मार्गक्रमणा करू लागली. त्यातून हिंदू जनभावना उग्र स्वरूप धारण करु लागली. त्यामुळे न्यायालयीन चमत्कार झाला आणि रामलल्ला चे कुलूप काढण्यासाठी याचिका दाखल झाली. काही दिवसात निकाल लागून कुलूप निघाले. कुलूप निघाल्यावर इथ पर्यंत कधीही आणि कुठेही अस्तित्वात नसलेली बाबरी मस्जिद कमिटी स्थापन झाली. कश्मीर मध्ये ३४ हिंदू मंदिरे पाडण्यात आली. ज्या ढाचावर स्थानिक मुस्लिम बांधव नमाज अदा करत नव्हते, तोच वाचवण्यासाठी देशभर प्रदर्शने सुरू झाली.
जनआंदोलने व अभियान यामुळे हिंदू जनजागृती होऊ लागली. जनमानसातील प्रभू रामांच्या जन्मस्थाना वरील मंदिर निर्माणासाठी आपल्या गावातील एक प्रातिनिधिक शीलापूजन करून शीला अयोध्येकडे रवाना करण्यास उदंड प्रतिसादातून सुरुवात झाली. धर्मस्थळ मुक्तीयज्ञ समितीने विश्व हिंदू परिषदेस जनमत संघटित करण्याचे काम दिले. या अभियानालाही पुरोगाम्यांनी न्यायालयीन आव्हान देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
प्रस्तावित राममंदिरासाठी ९ नोव्हेंबर १९८९ रोजी शिलान्यास करण्याची जी घोषणा करण्यात आली. त्यालाही सर्वस्तरातून विरोध करण्यात आला. शेवटी हिंदू जनभावनांसमोर केंद्र सरकारला झुकावेच लागले.
विशेष म्हणजे हे भूमिपूजन अनेक मान्यवरांच्या हस्ते पार पडले. त्याचा शुभारंभ श्री रामेश्वर चौपाल या हिंदू समाजातील मागास वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्याच्या हस्ते करण्यात आला जेणेकरून प्रस्तावित पतितपावन श्रीरामाचे मंदिर हे सामाजिक समरसतेचे प्रतीक असणार आहे असा संदेश देशभर गेला.
श्रीरामचरण पादुका, श्रीराम ज्योती यात्राद्वारे सामान्य हिंदू माणूस या आंदोलनाशी जोडला गेला. मा. लालकृष्ण आडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या या प्रचंड लोकप्रिय रथयात्रेने देशाचा राजकीय सारीपाट बदलून गेला.
न्यायालय, संसद, सरकार, प्रसार माध्यमे या लोकशाहीच्या चारही स्तभांकडून उपेक्षा झाल्याच्या भावनेने उग्र स्वरूप धारण करून ६ डिसेंबर १९९२ ला वादग्रस्त ढाचा नामशेष करून रामजन्मभूमी मुक्त केली.
दीर्घकालावधीच्या प्रतिक्षेची उपेक्षा केल्याने झालेल्या जनप्रक्षोभाचे समस्त हिंदू समाजाने स्वागत केले. तर स्युडो- सेक्युलर मंडळींनी यावर छाती बडवून घेऊन आपला तीव्र विरोध सुरु ठेवला. बाबरी ढाचाचे पतन झाल्यावर श्री रामलल्ला तात्पुरत्या स्वरूपातील मंदिरात विराजमान झाले.
या भूमीचे हस्तांतरण मंदिर निर्माणासाठी होतांना अनेक कायदेशीर व प्रशासकीय अडथळे आणले गेले. त्यामुळे उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा करण्यास तीन दशके गेली.
दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली विद्वत्ता पणाला लावली. शेवटी ऐतिहासिक, पुरातत्वीय, ग्रंथांमधील पुरावे, धार्मिक मान्यता हे सर्व न्याय कसोटीवर उतरले. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकाल पत्राने प्रदीर्घ संघर्षांची यशस्वी सांगता झाली.
स्वतंत्र भारतातील हिंदूंचा हा अभूतपूर्व संघर्ष इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल असाच आहे. यात जात-पंथ- भाषा-आर्थिक स्तर इत्यादी सर्व भेद विसरून हिंदू समाजाच्या ऐक्याचे विराट व तेजस्वी दर्शन घडले. श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा हा पांच शतकांच्या प्रेरणादायी संघर्ष आपणा सर्वांना एक वेगळी अनुभूती देईल हा विश्वास आहे.
।। जय श्रीराम ।। ।। वंदे मातरम् ।।
श्री संदिप शिवाजी जंगम
कोल्हापूर (महाराष्ट्र)
७०८३७३२०२०
jangamss82@gmail.com