महर्षी वाल्मिकींनी रामायणाच्या उत्तराखंडात सर्ग 36 मध्ये अनेक गुणविशेषांचे इतके छान वर्णन केले आहे. ""पराक्रमो साहमतीप्रताप स्यैशीस्यमाधुर्य नवान यैश्य / गांभीर्य, चातुर्य, सुविर्ध धैर्य ये हनुमंत: कोडप्यधि को$स्ति लोके४३-सोऽयं नवव्याकरणार्थ वेत्ता ब्रह्मा भविष्यतपि ते प्रसादात //४६. ते वर्णन वाचून इतके गुण असणारी रामायणातील व्यक्ती किंवा पात्र निःशंकपणे हनुमान - मारुती-- हनुमंत हीच आहे. त्याचे व्यक्तिमत्व वाचताना, खरोखरच मी इतकी भारावून गेले की, आपोआप माझे दोन्ही हात जोडले गेले. नमस्कारोमी प्रथम जेव्हा दृश्यमुख पर्वताच्या पायथ्याशी हनुमानाची रामाची भेट झाली, तेव्हा त्याच्या बोलण्याचा, वक्तृत्वाचा रामाच्या मनावर इतका परिणाम झाला की, त्याने उद्गार काढले, "वेदांमध्ये स्नान केले असल्याशिवाय असे वक्तृत्व कोणाचे असणार नाही". रामाने हनुमानाच्या वक्तृत्वाची अशी प्रशंसा केली.
मारुतीचा हनुमानाचा जन्म अंजनीचा आणि केसरी वानराचा पुत्र. अंजनी म्हणजे चेताशक्ती. आणि आकाश तत्व यापासून निर्माण झालेला वायु (मरूत) यांचा संयोग म्हणजे, तो मारुती. जन्मताच त्याने सूर्यबिंब फळ समजून त्याकडे झेप घेतली. आणि मग समर्थानी त्याचे वर्णन केले, " वाढता वाढता वाढे भेदिले सूर्य मंडळा" थोडक्यात विश्वाला व्यापून इतका भव्य झाला. म्हणजेच सर्वव्यापी झाला. राहूने घाबरून इंद्राची मदत मागितली. इंद्राने त्याच्या हनुवटीवर प्रहार करून त्याला पाडले. पण काहीच झाले नाही. सूर्याने, वरुणाने, कुबेराने, शंकराने, अखेर ब्रह्मदेवानेही त्याला वर दिले. तितकीच योग्यता असल्याशिवाय इतके वर कसे मिळतील बरं!
लहानपणापासून हनुमान सुग्रीवाचा मित्र होता 'मैत्र' हा गुण हनुमाना मध्ये पुरेपूर होता. सुग्रीवाच्या कठीण काळातही त्याला त्याने मित्रत्वाचा आधार दिला. वानर राज्यात हनुमानाने स्वतः विषयी एक आश्वासक स्थान निर्माण केल्यामुळे सुग्रीवाने त्याला शेवटपर्यंत मंत्रिपदावर बसवले वाली वधानंतर तारेच्या सांत्वनाची जबाबदारी त्यानेच घेतली. वानर राज्याच्या दुफळी करण्याच्या विचारांपासून अंगदला परावृत्त करुन, वानरांच्या राष्ट्राचा त्याच्या मुत्सद्देगिरीने सांभाळ केला. हे जबाबदार व्यक्तिमत्त्वच आहे ना! रामाचा हनुमानाच्या बुद्धिमत्तेवर इतका प्रगाढ विश्वास होता की, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी हनुमानाशी राम सल्लामसलत करीत असे. बिभिषणाला आश्रय देताना सर्वांच्या मनाविरुद्ध हनुमानाच्या मतानुसार त्याला आश्रय दिला गेला. सीतेच्या शोधाच्या कामात हनुमानावर रामाने खात्रीने विश्वास दाखवला. सीतेच्या शोधार्थ समुद्र उल्लंघून जाताना त्याला बौद्धिक, फासा, प्रलोभन, आणि भीती अशा खडतर परिक्षातून जावं लागलं. 'सरमा ' राक्षसिणीच्या मुखात, आपला आकार लहान करून, प्रवेश करून तो बाहेर आला. "अणूपासोनी ब्रम्हांडा" अशी सिद्धी त्याला प्राप्त होती. मैनाक पर्वत विश्रांती घेण्यास सुचवत असूनही हनुमंताने ते नाकारून, कर्तव्यनिष्ठा आणि निर्लोभ वृत्ती दाखवली. अशोक वनात सीतेला पाहिल्यानंतर, सीता आत्महत्येच्या विचारात असल्याचे त्याला दिसले. काय करावे सुचेना. द्विशृंगीका म्हणावे असे विचार सुरू झाले. पण दुसऱ्याचे अंतकरण ओळखण्याची त्याची शक्ती अपार होती वृक्षाआड बसून त्याने रामकथा मंद आणि मृदू आवाजात सीतेला सांगून, मुद्रिका ( रामाने दिलेली अंगठी) तिला देऊन तिचा विश्वास संपादन केला. एवढ्यानेच त्याचे काम झाले नाही, तर अशोक वनाचा त्याने विध्वंस केला. आणि लंका दहन केले. राक्षसाच्या मनात आपला विनाश अटल आहे अशी वृत्ती निर्माण करून, शत्रू राष्ट्राचा तेजोभंग केला. ही सर्वात महत्त्वाची आणि विश्वसनीय अशी कामगिरी त्याने केली. रामाचा आणि सीतेचा हनुमानावरील विश्वास आणखी दृढ झाला. खरोखरच हनुमंताचे किती गुण सांगावेत तितकेच कमीच त्याचे रामायणातील व्यक्तिमत्व प्रत्येकाला आवडेल असेच आहे. रावण वधानंतर सीतेला पहिला निरोप देण्याची कामगिरी हनुमानानेच केली. पुढे जाऊन भरताला आपण म्हणजे, राम येत असल्याचा निरोप सांगून, त्याचे सूक्ष्म भाव ओळखण्याचे नाजूक कामही त्यानेच केले हनुमान ब्रह्मचारी होते . चारित्र्याच्या दृष्टीने श्रेष्ठ होते. लंकेत रावणाच्या अंत:पुरातील स्त्रियांना पाहून, त्याला आपण पापी आहे असे वाटले. पण नंतर त्यांना पाहून आपल्या मनात कोणताही वाईट विचार आला नाही, सीतेचा शोध घ्यायला स्त्रियाच पाहाव्या लागतील, असा विचार करून, आपण निर्दोष आहोत असे आपल्या मनाचे त्याने समाधान केले. एक पापभिरु मनाचे किती छान विश्लेषण आहे ना !
श्रीरामाची प्रायोपवेषणाची बातमी कळल्यानंतर, हनुमान श्रीरामाकडे आले. श्रीराम हनुमानाच्या उपकाराची श्रेष्ठता योग्य मानित असत. त्याचप्रमाणे हनुमानाची रामा विषयीची धारणा व्यक्त करताना रामांना वर प्रदान मागितले आहे." स्नेही मे परमो राजं स्त्वयि तिष्ठतु नित्यदा/ भक्तीश्च नियता वीर भावो नान्यत्र गच्छतु / यावद्रामकथा वीर चरिश्यति महितले/ यावच्छरीरे वात्स्यन्तु प्राणा मम न संशय//य च्चैतच्चरित्रं दिव्यकथा ते रघुनंदन/तन्ममाप्सरसो राम श्रावयेयुर्नरर्षम//तच्छरुत्वाहं ततो वीरतव तर्था मृतं प्रभो / उत्कष्ठां तां हरिष्यमि मेघलेखाभिवानिलः// रामाने हनुमंताला अलिंगन दिले. आणि सांगितले, " माझी कथा भूलोकात असेपर्यंत, तू भू लोकातच राहशील. हनुमंत आज चिरंजीव आहेत ते यामुळेच.
आज रामरक्षा हे कवच ऐकायला हनुमान असतातच. तसेच शारीरिक आणि मानसिक बल मिळवण्यासाठी हनुमंताची भक्ती, आराधना आणि बलोपासना करण्याची गरज आहे. समर्थांनी पंधरा श्लोकांमधे जणू चंद्राच्या कला, असे मारुती स्तोत्र लिहिले आहे. ते लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने रोज म्हणण्याची गरज आहे . स्तोत्राच्या नादाच्या कंपन्यातून शरीरातील षटचक्रे विकसित होतात. पचन, श्वसन, स्मरणशक्ती सुधारते. बलोपासनेसाठी समर्थांनी अकरा मारुती स्थापन करून मंदिरे बांधली. आणि आखाडेही सुरू केले.
आज शास्त्रीय शोध वाईट नाहीत. उत्पादन साधने ही वाईट नाहीत. भौतिक सामर्थ्य तर आश्चर्य वाटावे असे आहे . पण ते ज्याच्या हाती आहे, तो मानव अनेक ठिकाणी पशू झाल्यामुळे अनेक गोष्टी विनाशक झाल्या आहेत. अशा वेळी पाशवी सामर्थ्य जसे नको, तसेच शक्तीहीन अध्यात्मिकताही नको. भारतीय राष्ट्राचा ध्येयवाद सांगणारा, योग्य स्वरूप दिग्दर्शित करणारा, इतक्या उच्च स्वरूपाचा, वाल्मिकींनी लिहिलेला ' रामायणा' सारखा ग्रंथ दुसरा नाही . अध:पतित अवस्थेत रामायणाचीच कास धरली गेली. श्री राम आणि हनुमान यांचे आदर्श डोळ्यासमोर घेतले. आजही घ्यायला हवेत. जागोजागी हनुमान मंदिरे आणि बलोपासना केंद्रे व्हायला हवीत. आजच्या धावपळीच्या, ताण-तणावाच्या, भयग्रस्त अवस्थेत सर्वांनी दिवसातून संध्याकाळी -- रात्री, एकदा तरी भीमरूपी, स्तोत्र, हनुमान चालीसा, रामरक्षा (परवचा) म्हणावी. आश्चर्यजनक फरक पडेल. कृण्वंतो विश्वमार्यम असे भारतीय संस्कृतीने म्हटले आहे.
राम, लक्ष्मण, जानकी जय बोलो हनुमानकी जय बोलो हनुमानकी.
सौ पुष्पा नंदकुमार प्रभू देसाई
39 पुष्पानंद बुधगावकर मळा रस्ता मिरज 416 410
मो.9403570987