कोस्मिनसांप्रतम लोके गुणवान च वीर्यवान ।
धर्मज्ञ कृतज्ञ सत्यवाक्यो द्रुढव्रतः ||
-(बालकांड सर्ग १, श्लोक १-५)
रामायणाच्या सुरुवातीलाच आदिकवी वाल्मिकी नारदांना विचारतात सर्व भूलोकात गुणी, पराक्रमी, धर्म आणि कर्माचे मर्म जाणणारा, सत्यवचनी, आपले व्रत पूर्ण करणारा, चारित्र्यवान, सगळ्या प्राणिमात्रांचे हित पाहणारा, क्रोधावर नियंत्रण मिळवलेला असा कोण वीर आहे ? या श्लोकातील वर्णन जसे प्रभू श्रीरामांना लागू होते तसेच त्यांचा प्रिय बंधू असूनही अभिमानाने स्वतःला त्यांचा दास म्हणवणाऱ्या, परमप्रतापी, विवेकी भरतालाही तंतोतंत लागू होणारे आहे.
श्रीविष्णूंच्या सुदर्शन चक्राचा अवतार म्हणून ओळखला जाणारा 'भरत' माझे रामायणातील अत्यंत आवडीचे पात्र आहे. अयोध्याकांडातील सर्गातून त्याच्या स्वभावातील विविध पैलूंवर प्रकाश पडतो. मातुलगृही असणाऱ्या भरताला अयोध्येत बोलवायला आलेल्या दूताला भरत विचारतो -
आत्मकामा सदा चंण्डि क्रोधना प्राज्ञमानिनी ।
अरोगा चापि मे माता कैकेयी किमुवाच ह ||
-(अयोध्याकांड सर्ग ७०, श्लोक १०)
(माझी आत्ममग्न, संतापी आणि आपल्या बुद्धीचा गर्व असणारी माता कैकेयी सुद्धा निरोगी आहे ना ?)
कोवळ्या वयातही भरताला आपल्या आईच्या स्वभावाचे योग्य आकलन झालेले आहे. आणि तरी त्याचे तिच्यावर डोळस प्रेम आहे. अयोध्येत कैकेयी आपण मोठं सत्कृत्य केल्याच्या समजुतीने भरताला दशरथाच्या मृत्यूची, रामाच्या वनवासाची आणि भरताला राज्य मिळाल्याची कथा सांगते. कोणाही सामान्य व्यक्तीला राज्याचा मोह पडला असता, पण भरताच्या मनःस्थितीचे वर्णन आदिकवी करतात, एखाद्या अजस्त्र वृक्षाने भूमीवर पडावे तसा भरताने दुःखावेगानी भूमीवर पडून शोक केला. परंतु मनाच्या इतक्या क्रुद्ध, चिंतीत आणि व्यथित अवस्थेतही त्याला क्षत्रिय कर्तव्याचे विस्मरण होत नाही. श्रीरामांच्या वनवासाला कारणीभूत ठरलेल्या मंथरेला शत्रुघ्न ठार मारेल असे पाहून भरत त्याला म्हणतो -
अवध्याः सर्वभूतांना प्रमदः क्षम्यतामिति ।
-(अयोध्याकांड सर्ग ७९, श्लोक २१)
(सर्व प्राणीमात्रात अवध्य असणाऱ्या स्त्रीला मारू नकोस, क्षमा कर.)
भरताने दशरथाच्या अंत्यसंस्काराचे पुत्रकर्तव्य पार पाडून लगेच राजसभा बोलावली. यावेळी 'नेता' भरताचे वाल्मिकी वर्णन करतात -
दशरथसुतशोभितसभा सदशरथेव बभूव सा पुरा ।
-(अयोध्याकांड सर्ग ८१, श्लोक १६ )
(दशरथपुत्राच्या (भरताच्या) उपस्थितीने सभा जशी शोभिवंत दिसत होती तशी पूर्वी स्वतः महाराज दशरथ उपस्थित असले कि दिसत असे.)
पितृशोकाने व्यथित, लोकनिंदेने लज्जित आणि श्रीरामांच्या विरहाने व्याकुळ होऊनही हि भरत सभेत शांत, गंभीर, धैर्यवान अगदी त्याच्या पित्याप्रमाणे शोभत होता.
रामाला शोधायला निघालेल्या भरताच्या हेतूविषयी अनेकांनी शंका घेतली. निषादनरेश गुह, ऋषी भारद्वाज, एवढेच काय लक्ष्मणहि त्याच्याविषयी साशंक होते. पण एवढ्या लोकापवादानेही भरताच्या मनात कटुता आली नाही. त्याच्यावर शंका घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याने शांत आणि विनयी सुरात आपला हेतू सांगितला आणि त्यांचे साहाय्य मिळवले.
श्रीरामांनी भरताला राज्यग्रहण करायला सांगितले. वास्तविक आता त्यांनी स्वतः राज्यावर पाणी सोडल्याने भरताचा राज्यभिषेक न्याय्यच होता. पण भरताचा निश्चय बदलला नाही. त्याने राजाची सर्व कर्तव्ये स्वीकारून अधिकार मात्र भ्रातृचरणी अर्पण केले. अयोध्येचा राजा होण्याचा पूर्ण नैतिक अधिकार असूनही नगरसीमेबाहेर पर्णकुटीत राहिला. वल्कलं परिधान केली. आणि हे सन्यस्त, ब्रह्मचारी जीवन ज्या कैकेयीच्या दुष्कृत्यांमुळे स्वीकारावे लागले तिलाही क्षमा केली.
१४ वर्ष भरताकडे अयोध्येचे सार्वभौम अधिकार होते. या काळात त्याला सत्तेचा मोह किंवा किमान सवय तरी व्हायला हवी होती. पण रामदूत मारुतीकडून राम अयोध्येला येत असल्याचे ऐकून तो उलट अतिशय प्रसन्न आणि दर्शनोत्सुक झाला.
उत्तरकांडात भरताचे एक नवीन पैलू दिसतो. राजसूय यज्ञ लोकमान्य असतानाहि, त्यातून प्रचंड नरसंहार होईल म्हणून या यशदायी यज्ञाला विरोध करणारा भरतासारखा सदहृदय वीर, आणि आपल्या दोन्ही पुत्रांना संपन्न राज्ये स्थापून देणारा वत्सल पिता विरळाच! म्हणूनच भरताचे गुणगान गाताना गोस्वामी तुलसीदासजी लिहितात -
भरत सुभाउ न सुगम निगमहूँ। लघु मति चापलता कबि छमहूँ ॥
कहत सुनत सति भाउ भरत को। सीय राम पद होइ न रत को ॥
भरताच्या स्वभावाचे वर्णन करणे वेदांनाही जिथे कठीण तिथे आपल्याला ते कसे शक्य आहे? त्याच्या सद्भावाच्या स्मरणाने आपले मन सीतारामांच्या चरणी नेहमी रत होवो.
जय सियाराम !!