त्यांच्या एकुलत्या एक बहिणीच्या साखरपुड्यानंतर चारच दिवसांनी 22 ऑक्टोबर 1990 रोजी राम (वय – 22) आणि - शरद (वय - 20) हे दोन तरुण तरुण कोलकाताहून (तेंव्हाचे नाव कलकत्ता) कारसेवेसाठी निघाले.
घरामध्ये नुकतंच मंगल कार्य झालं होतं. त्यामुळे साहजिकच या तरुण भावांना त्यांच्या घरच्यांनी प्रवासात खाण्यासाठी बरीच मिठाई दिली होती. त्यांच्या घरी किंवा शेजारी कुठंही फोन नसल्यानं रोज खुशाली कळवणारं पत्र लिहा असं बजावलं होतं.
कोलकाताहून निघालेल्या अन्य कारसेवकांसह ते उत्तर प्रदेशात दाखल झाले. त्यावेळी कारसेवकांची वाट सोपी नाही हे त्यांच्या लक्षात आलं. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी कारसेवा यशस्वी होऊ द्यायची नाही असा निश्चय केला होता.
राम आणि शरद यांचा समावेश असलेल्या कारसेवकांची तुकडी आडमार्गानं, मिळेल त्या वाहनानं किंवा चालत मजल दरमजल करत अयोध्येच्या दिशेनं निघाली.
'तुमच्या जवळचं सामान जास्तीत जास्त कमी करा... अयोध्येच्या मार्गावरील एखाद्या ठिकाणी सुरक्षित ठेवा. परत येताना घेऊन जा,' अशा सूचना त्यांना देण्यात आल्या. एका मुक्कामी एका कारसेवकानं आपल्या तुकडीच्या प्रमुखाला 'आपण अयोध्येत कधी जाऊ?' असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी एक आठवडा लागेल असं उत्तर दिलं.
मुलायम सिंह सरकारची दडपशाही सुरू असली तरी उत्तर प्रदेशातील सामान्य नागरिकांचा कारसेवकांना पाठिंबा होता. त्यांच्या मदतीमुळेच सर्व अडचणींवर मात करत राम आणि शरद 30 ऑक्टोबरला अयोध्येला पोहोचले. त्यांनी कारसेवेत भाग घेतला.
रामजन्मभूमीच्या स्थळी त्यावेळी असलेल्या घुमटावर भगवा ध्वज फडकावला. घुमटावर सर्वात प्रथम चढणाऱ्या कारसेवकांमध्ये शरद होता. तिथं ध्वज फडकवण्याचं काम या भावांनी केलं. मुलायम सिंह सरकारच्या दडपशाहीचा पराभव झाला.
दोन दिवसांनी कार्तिकी पौर्णिमा होती. त्या दिवशी कारसेवकांनी शरयू नदीत स्नान केलं. दुपारी राम मंदिराच्या परिसरात सहज सहज फिरत असलेल्या या दोन्ही भावांवर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.
1991 पासून जवळपास दरवर्षी या दोन तरुणांचे कुटुंबीय अयोध्येला जातात. एकदा राम आणि शरद यांच्या आईला मंदिराच्या परिसरात अश्रू अनावर झाले. तिथं जवळच उभ्या असलेल्या एका सुरक्षा रक्षकानं ते पाहिलं. त्यांना कारण विचारलं. आपल्याशी बोलत असलेली महिला कोठारी बंधूची आई आहे हे समजल्यावर तो त्यांच्या पाया पडला.
22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर सर्वांसाठी खुलं होईल. या मंदिराच्या उभारणीसाठी हजारो ज्ञात- अज्ञात व्यक्तींनी अक्षरशः सर्वस्वाची होळी केली. त्यांनी पाहिलेलं स्वप्न आता साकार होतंय.
कोठारी बंधूच्या आयुष्यावरील एक सुंदर लेख नुकताच वाचला. हा लेख वाचताना डोळ्यात पाणी येतं...
जय श्रीराम!
Omkar Danke Mumbai