जय श्रीराम
रामायण, महाभारत हे हिंदुमहाकाव्य भारतीयांच्या मनावर अधिराज्य तर करतातच आहे. शिवाय संपूर्ण विश्वातील जनमानसावर देखील या दोन्ही महाकाव्यांनी गारुड केले आहे. हे निर्विवाद सत्य आहे. मानवी स्वभाव वैशिष्ट्यांचे प्रतीक म्हणून महाभारताकडे पाहिले जाते तर सर्व प्रकारच्या आदर्शवादाचे प्रतीक म्हणून रामायणाकडे पाहिले जाते. शक्ति युक्ति भक्ति यांचा मिलाफ म्हणजे रामायण ! असे म्हटल्यास वावगे होणार नाही असे मला वाटते.
याच रामायणातील वालीपत्नी तारा या स्त्रीव्यक्तिमत्वावर मी माझ्या अल्पबुद्धीने प्रकाश टाकू इच्छिते. जिला प्रत्यक्ष रामायणकार वाल्मिकी ऋषींनी रामायणातील सर्व स्त्रीयांमध्ये सर्वात जास्त महत्त्व दिले आहे. खरे तर---
क्क सूर्यप्रभवो वंशः ।
क्व चाल्पविषया मतिः ।।
तितीर्षुर्दुस्तरं मोहादु-
डुपेनास्मि सागरम् ।।
(रघुवंश महाकाव्य)
कुठे तो भगवान सूर्यापासून निर्माण झालेला वंश? कुठे माझी अल्पक्षमता असणारी बुद्धी? मोहवशात छोटयाशा डोंगीने सागर पार करण्याची इच्छा करीत आहे. या न्यायाने कुठे ताराचे असामान्य व्यक्तिमत्व आणि कुठे सामान्य अशी मी! पण श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने धाडस करते आहे.
ही तारा कोण होती? तारा ही समुद्रमंथनातून निघाली असे पुराण सांगते. समुद्रमंथनाच्यावेळी देवतांना सहाय्यक म्हणून वानरसम्राट वाली आणि वानरवैद्य सुषेण तिथे हजर होते. ताराच्या अप्सरीय सौंदर्याने दोघेही मोहित झाले आणि दोघांनाही तिच्याशी लग्न करायचे होते. पण तेव्हा विष्णूने या समस्येचे निराकरण केले. ताराच्या उजव्या बाजूला जो उभा असेल तो पती आणि जो डाव्या बाजूला उभा असेल तो पिता! या न्यायाने वाली हा ताराचा पती झाला आणि सुषेण हे ताराचे पिता झाले. काही ग्रंथात तारा ही बृहस्पतीची नात (मुलाची मुलगी) होती असेही म्हटले आहे. असो. रामायणातील वालीपत्नी म्हणूनच ती समाजमान्य आहे. हे विशेष!
अचाट बुद्धिमत्ता, चतुराई, धैर्य, दूरदृष्टी, आत्मविश्वास, पतीवरील म्हणजेच वालीवर असलेले तिचे अपार निस्सीम प्रेम यामुळे प्रातः स्मरणीय पंचकन्यापैकी एक म्हणून तिचा गौरव केला जातो हे आम्हा भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे नाही का!
वालीपत्नी तारा रामायणातील एक प्रखर व्यक्तिमत्व, किष्किंधा नगरीची सम्राज्ञी सौंदर्यवती तर होतीच शिवाय ती वाक्पटू कुशल राजनीतीज्ञ होती. वानरसमाज पुरुषप्रधान होता. तत्कालीन प्रथेनुसार स्त्रीया केवळ भोग्यवस्तू असून पतीच्या मृत्युनंतर त्याच्या भावाची अधीनता तिला स्वीकारावी लागत असे. ज्या भावाने षड्यंत्र रचून ताराच्या पतीचा वालीचा वध केला त्याच भावाची कनिष्ठ पत्नी म्हणून राहावे लागले यात ताराला किती मानसिक यातना सहन कराव्या लागल्या असतील याची कल्पनाच न केलेली बरे! तरीही आपल्या पुत्राच्या भविष्यासाठी, वानरजातीच्या कल्याणासाठी तिने सर्व यातना आनंदाने सहन केल्या. दुसऱ्याच्या हितासाठी, कल्याणासाठी स्वतः त्रास सहन करुन आत्मविश्वासाने कार्य करणारी रामायणात तारासारखी प्रखर स्त्री अन्य नसावी असे मला वाटते.
तारा केवळ वालीपत्नी, किष्किंधा नगरीची सम्राज्ञी, एवढेच नव्हती तर तिचा राजकारणात देखील उत्तम सहभाग होता. गुप्तचर यंत्रणेचा वापर कसा करायचा याचेही तिला उत्तम ज्ञान होते. राज्यात व संपूर्ण भरतखंडातील घडामोडीचे ज्ञानही तिला होते. वालीपासून लपून राहणाऱ्या सुग्रीवाने वालीला द्वंद्व युद्धासाठी ललकारले आणि वालीकडून पराजितही झाला हे बघून ताराचे मस्तक ठणकले आणि सुग्रीवाने हे दुस्साहस कसे केले आणि त्याचे कारण काय याचा शोध घेण्याचे तिने ठरविले. गुप्तचरांकडून इत्थंभूत माहिती मिळविली. परंतु सुग्रीवाने त्याच दिवशी भरपूर मार खाऊनही वालीला पुन्हा द्वंद्व युद्धासाठी ललकारले. निश्चितच यामागे काहीतरी षड्यंत्र आहे याची जाणीव ताराला झाली. तिने वालीला युद्धापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला. ताराने किमान सकाळ पर्यंत तरी थांबण्याचा सल्ला दिला पण क्रोधग्रस्त आणि अहंकारी वाली ताराचे ऐकेल तर तो वाली कसला? शेवटचा प्रयत्न म्हणून तिने गुप्तचरांकडून मिळालेली सूचना देखील पतीला सांगितली. श्रीराम आणि लक्ष्मण यांनी दंडकारण्यातील खर दुषणसहित हजारो राक्षसांना यमसदनी पाठविले आणि जनतेला राक्षसी अत्याचारा पासून मुक्त केले. अशा श्रीरामाशी सुग्रीवाने मैत्री केली असून श्रीरामाने किष्किंधासम्राट बनविण्याचे सुग्रीवाला वचन दिले आहे. यामुळे ताराने वालीला सल्ला दिला की परिस्थितीला ओळखा यावेळी पराक्रमी श्रीरामाशी वैर पत्करणे योग्य नाही. उलट त्यांना शरण जा. सुग्रीव पत्नी रुमाला सन्मानाने सुग्रीवाच्या स्वाधीन करा. त्याला युवराज पदावर अभिषिक्त करा. परंतु तिची सूचना वालीच्या पचनी पडली नाही. आणि त्याने तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. अखेर परिणाम व्हायचा तो झालाच. मृत्युशय्येवर असतांना वाली सुग्रीवाला म्हणतो. सुग्रीवा प्रत्येक बाबतीत ताराचा सल्लामसलत घे. तिचा परामर्श घेतल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नको. मी तिचा सल्ला मानला असता तर आज मी ज्या अवस्थेला पोहोचलो ते झाले नसते. असो. केवढा हा एका सम्राटाचा राणीविषयीचा आणि पतीचा पत्नीविषयीचा विश्वास!
वालीचे हितचिंतक वानरांनी वालीच्या मृत्युची वार्ता ताराला दिली आणि अंगदासह पलायन करण्याचाही सल्ला दिला. पण ताराने हे मान्य केले नाही. ती कुठेही पळून गेली नाही तर ती युद्धभूमीवर ती गेली. त्या परिस्थितीतही क्रोध आणि दुःख आवरुन आपल्या पुत्राच्या हिताचे रक्षण केले. तिला माहीत होते की श्रीराम न्यायी आहेत ते कोणावरही अन्याय करणार नाही. जे घडले त्यात वालीचाच दोष होता याची तिला जाणीव होती. तिने वाक्चातुर्य दाखवित श्रीरामाला विनंती केली की माझा पण वालीप्रमाणे वध कर. तिची मात्रा बरोबर लागू पडली. श्रीरामाने सुग्रीवाला किष्किंधा नगरीच्या राजपदावर तर वालीपुत्र अंगदाला युवराजपदावर अभिषिक्त केले. केवढी ही ताराची कुशलता! किती ही राजनीती! भविष्यात पुत्राचा राजा होण्याचा मार्ग खुला केला.
राजप्रासादात विलासात मश्गुल झालेला सुग्रीवाला रामाला दिलेल्या वचनाचा विसर पडला. परिणामी सीताशोध कार्यात दिरंगाई होऊ लागली. त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन लक्ष्मण राजवाड्यात सुग्रीवाला जाब विचारायला आला. तिथे त्याला सुग्रीव ताराच्या महालात असल्याचे कळले आणि लक्ष्मण अधिकच संतापला. लक्ष्मण आल्याची वार्ता ऐकून सुग्रीव घाबरला आणि त्याने त्या बिकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तारालाच पाठविले. वेळप्रसंगी ओळखून ताराने लक्ष्मणाची मनधरणी केली. हे वीर राजकुमार लक्ष्मणा, ही क्रोध करण्याची वेळ नाही. सुग्रीवच्या मनात तुमचे कार्य करण्याची मनीषा आहे. काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. क्रोधग्रस्त असल्याने तुला कामासक्त माणसाच्या परिस्थितीची कल्पना नाही. कामासक्त होऊन वानरराज सुग्रीव माझ्याकडे आले होते. कामाच्या अधीन झाल्यामुळे त्यांच्या हातून चूक झाली असेल. त्यांना बंधू समजून क्षमा करावी.
महर्षयो धर्मतपोऽभिकामाः कामानुकामाः प्रतिबद्धमोहाः ।
अयं प्रकृत्या चपलःकपिस्तु कथं न सज्जेत सुखेषु राजा ।।
(किष्किंधा कांड 33/5)
अर्थात-तपस्यारत महर्षी ही कामाच्या अधीन होतात. सुग्रीव तर एक चंचल वानर आहे. तो कामाच्या अधीन झाला तर त्यात गैर काय?
तारा पुढे म्हणाली, जरी सुग्रीव कामासक्त झाले असतील तरी त्यांनी आपले कार्य सिद्ध करण्याची सुरवात केली आहे. लवकरच लाखोंच्या संख्येने वानरसैन्य येथे येऊन पोहोचतील आणि आपल्या कार्याला अधिक जोमाने सुरवात होईल. अशाप्रकारे कुशल वाक्चातुर्याने तिने लक्ष्मणाचा राग शांत केला.
सुग्रीवला भेटल्यावर लक्ष्मणाचा क्रोध पुन्हा जागा झाला. त्याने अत्यंत कठोर शब्दात सुग्रीवाची निंदानालस्ती सुरु केली. यावेळी मात्र ताराने देखील कठोर भूमिका घेतली. तिने कठोर शब्दात लक्ष्मणाला बजावले. सुग्रीव हे वानरराज आहेत. एका राजाला कोणत्याही परिस्थितीत कटू बोलणे योग्य नाही. राजाचा सन्मान आदर ठेवायलाच पाहिजे. ती लक्ष्मणाला म्हणते, सुग्रीव कृतघ्न तर नाहीच पण असत्यही बोलत नाही. ते निश्चितच अधम राक्षसांचा वध करण्यास समर्थ असून सीतेला रावणाच्या तावडीतून मुक्त करतील. तारा पुढे म्हणाली, वर्षानुवर्षे दुःखी असलेल्या माणसाला सुख मिळाले आणि त्याचा उपभोग घेण्यात दंग झाले तर त्यात बिघडले कुठे? थोडा उशीर झाला म्हणून त्याच्याशी एवढे कठोर वागणे उचित नाही. ताराने श्रीरामाच्या न्यायाची प्रशंसा केली. रावणाच्या बलाचे, त्याच्या सैन्यबलाचे देखील तिने वैशिष्ट्ये सांगितले. तिने लक्ष्मणाला स्पष्ट शब्दात बजावले की-
ते न शक्या रणे हन्तुमसहायेन लक्ष्मणः ।
रावण:क्रूरकर्मा च सुग्रीवेण विशेषतः ।।
(किष्किंधा कांड 35/7)
अर्थात-कुणा एकट्याला रावणाचा आणि त्याच्या राक्षस सैन्याचा वध करणे अशक्य आहे. वानरराज सुग्रीवाच्या मदतीची श्रीरामाला तेवढीच गरज आहे.
अशारितीने आपल्या वाक्चातुर्याने आणि युक्तिवादाने ताराने लक्ष्मणाला सत्य परिस्थितीची जाणीव करुन दिली. लक्षात असू द्या ज्याप्रमाणे तुम्ही सुग्रीवाला मदत केली. त्याप्रमाणे तुम्हालाही सुग्रीवाच्या मदतीची तेवढीच गरज आहे. किती कुशलतेने ताराने राजाचा सुग्रीवाचा सन्मान तर राखलाच शिवाय गरज असतांना असे कठोरतेने वर्तन करणे अयोग्य आहे याची समोरच्या व्यक्तीला जाणीव करुन दिली. परिणामी लक्ष्मणाचा क्रोध शांत झाला. त्याच्या क्रोधापासून वानरांचे आणि सुग्रीवाचे ताराने कुशलतेने संरक्षण केले.
ताराच्या या स्वभाववैशिष्ट्यांचा प्रभाव तत्कालीन समाजमनावर आरुढ झाला त्याचा आदर्श पुढील पीढीने स्वीकारावा. म्हणूनच प्रातः स्मरणीय स्तोत्रामधील पंचकन्येमध्ये ताराला अढळ स्थान प्राप्त झाले.
अहल्या द्रौपदी तारा, कुंती मंदोदरी तथा ।
पंचकन्याः स्मरेत् नित्यं महापातक नाशनम्।।
(ब्रह्मपुराण 3-7-219)
उपरोक्त पाच स्त्रियांनी कधीही अन्याय सहन केला नाही आणि आपले उद्दिष्ट साध्य केले. पण यांच्यामध्ये तारा सर्वश्रेष्ठ आहे. कारण तिने केवळ स्वत:चाच स्वार्थ नाही तर संपूर्ण वानरजातीचेही हित साध्य केले.
विवाह बंधन स्वीकारले असते. संतानप्राप्ती सुद्धा झाली असते. तरीही उपरोक्त स्त्रीया आपल्या संस्कृतीत कुमारिका म्हणून संबोधल्या जातात आणि पापनाशक म्हणून पवित्र मानल्या जातात. ते त्यांच्या सत्शील वर्तनाने त्यांच्या समाजविधायक कार्यामुळेच! हाच आदर्श अंगी बाणता यावा म्हणून या प्रातस्मरणीय स्तोत्राचे पठन करावे. हा संदेश ताराचे व्यक्तिमत्व दिल्यावाचून राहत नाही.
श्रीरामचरणी ही शब्दफुले समर्पित करुन लेखाची सांगता करते.
धन्यवाद!
सौ. अनुराधा पाठक
चिंचवड पुणे