आजच्या काळातील रामकथेचं महत्त्व

NewsBharati    20-Jan-2024 20:48:15 PM
Total Views | 18
रामायण म्हणजे श्रीरामाची जीवन यात्रा अर्थात प्रभू श्रीरामांचं मनुष्य अवतारातलं जीवन रहस्य. रामायणातील सगळिच पात्रं आपल्याला खूप काही शिकवून जातात, मग तो धाडसी जटायू असो, रामभक्त हनुमान असो किंवा चिमुकली निःस्वार्थी खारुताई असो. प्रत्येकालाच आयुष्यात अगणित संकटांना सामोरे जावे लागते परंतु आपल्या मार्गाची निवड जर या पात्रांसारखीच त्यागाने, निष्ठेने, सत्याने आणि रामभक्तिने जोपासलेली असेल तर आयुष्याचे सार्थक होणे अनिवार्य आहे. जर अखंड महासागरात श्रीरामाच्या नावाने कोरलेले दगड स्थिर राहू शकतात मग मनाच्या सागरात खळणाऱ्या दुःखांचं समाधान श्रीरामच आहे. स्वयं भगवंताला इतक्या अडचणी येऊ शकतात मग आपण तर केवळ मनुष्य आहोत!
 
the importance of Ramkatha in today's times
 
या कलियुगात सगळ्यांना सोपं आणि सरळ जीवन हवय. कमीत कमी मेहनत, असंतोष, उतावीळपणा, अनेक पर्यायांची उपलब्धता आणि मनुष्य एवं भगवंतावर अविश्वास सर्वत्र पाहायला मिळतो. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना सोयी सुविधा झटपट मिळतात. या अशा अति संलग्न जगात आपण एकमेकांपासून आणि कुठेतरी नकळत देवापासून ही लांब जात चाललो आहोत. भौतिकवादात गुरफटून आपण आपल्या जीवनाचं उद्देश्य विसरून जातोय. अशा परिस्थितीत भगवंताने दाखवलेल्या मार्गावर चाललं तर निश्चितच प्रकाशा शिवाय देखील वाट आपोआप उलगडली जाईल.
 
राम कथेतील प्रत्येक पात्र आपल्याला निःस्वार्थ भक्ती आणि एकनिष्ठपणाकडे प्रेरित करतं. स्वयं श्रीरामचंद्र केवळ आपल्या पिताश्रींच्या आदेशानुसार आणि आपल्या धर्माचा आदर करत चौदा वर्षं वनवास स्वीकारतात. फक्त अयोध्या नाही तर अख्खं वन मला भेट मिळत आहे अशी सांत्वना देत प्रभू श्रीराम वनवासास निघाले होते. आजच्या युवा पिढीला ही गोष्ट खूप प्रेरणादायक आहे. आयुष्यात सगळेच निर्णय आणि अमान्य गोष्टी या कुठेतरी आपल्या धर्माला जोडलेल्या असतात. त्यांचा स्वीकार न करत आणि वडीलधाऱ्यांचे निर्णय रद्द करून आपण आपल्याच आयुष्यातल्या ध्येयापासून दुरावतो. अखंड राम कथेत आपण श्रीरामांचं पुरुषोत्तम स्वरूप बघतो. मग ते राजा म्हणून असो, पुत्र, ज्येष्ठ भ्राता, शिष्य, मित्र, पती, मार्गदर्शक किंवा योद्धा म्हणून असो. शत्रूच्या समोर देखील कुठल्याही मर्यादांचे उल्लंघन न करत त्यांनी विजय मिळवला होता. सीतामातेपर्यंत पोहोचायला त्यांना एक वर्षाचा कठोर वनवास झाला होता आणि तत्पश्यात वानर सेनेवर आणि सृष्टीच्या सगळ्या जीवांवर विश्वास ठेवत त्यांनी अन्यायावर आक्रमण केले होते. अनिश्चिततेच्या काळोखात त्यांनी धर्माने आणि सत्याने या जगाला उज्ज्वलित केले होते; त्यांच्या सहिष्णुतेने आणि धैर्याने अहंकारी दशाननाला ही पराजित केले होते. ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवून जाते. जर उद्देश्य अटळ आणि योग्य असेल आणि आपण देवावर विश्वास ठेवत प्रयत्न करत राहिलो तर कुठलीच शक्ती आपल्यासमोर मोठी ठरू शकत नाही. विजयानंतर देखील सोन्याच्या लंकेचा यत्किंचितही मोह न ठेवत "जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी" ह्यास मान्यता देत श्री रामचंद्र अयोध्येस परतले होते. एवढेच नाही तर प्रत्येक जीवाला ते निःस्वार्थ प्रेम आणि करुणा देत आले आहेत. तरुण पिढीने आपले कर्तव्य करणे हीच श्री रामचंद्रांच्या चरणी सेवा ठरेल.
 
राम कथा ही सगळ्यांच्याच त्यागाची आणि अतूट विश्वासाची कथा आहे. रावणाच्या कैदेत अन्न, पाणी आणि निद्रा रहित फक्त रामनामाचा जप करत वाट बघणाऱ्या पतिव्रते सीता मातेची कथा आहे. राज्य सुखांचा मोह सोडून भ्राता धर्म आणि वनवास स्वीकारणाऱ्या लक्ष्मणाची कथा आहे. पिता समान भ्राताला राजा समजून स्वतः निरपेक्षेने संरक्षकाची भूमिका निभावणाऱ्या भरत आणि शत्रुघ्नाची कथा आहे. आत्मसमर्पित रामभक्त हनुमान, बिभीषण, जटायू, सुग्रीव आणि सगळ्याच वानरसेनेची कथा आहे. ही कथा तितकीच रावणाची देखील आहे, जी आपल्याला अहंकार, मोह आणि लोभाच्या वाईट परिणामांचा परिचय करून देते.
 
आजच्या अन्यायग्रस्त जगात सगळ्यांच्या बुद्धीतला रावण नष्ट होऊन मनात श्रीराम वसो हीच प्रार्थना. ज्याच्या निव्वळ आदरार्थीक स्पर्शाने शिव धनुष्य देखील उचलले गेले त्या प्रभू श्रीरामांना माझा शत शत प्रणाम.
 
॥ आपादामप हर्तारं दातरं सर्व संपदाम्
लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् ॥
 
वेदा जोशी
नवीन पनवेल