॥श्री ॥
रामायण कधी घडले? काही तज्ज्ञ म्हणतात ७००० वर्षांपूर्वी घडले तर काही अभ्यासकांचे म्हणणे आहे त्याहूनही आधी रामायण घडले. पण कितीही आधी घडलेले का असेना, महाकाव्याच्या रुपात लिहिला गेलेला हा इतिहास अजूनही लोकांच्या मनावर राज्य करत आहे. अजूनही रामायाणाशी लोकांना तितकीच जवळीक जाणवते. एखाद्या चित्रपटाची लाट येते. पण चित्रपट कितीही आवडला तरी काही काळाने, काही महिन्यांनी, काही वर्षांनी तो चित्रपट, ती गोष्ट मागे पडतेच. परंतु रामायणाचे मात्र असे नाही. रामायण घडून युगे उलटली तरी सुद्धा रामायणातल्या गोष्टी सगळ्यांना रुचतात आणि विचार करायला भाग पाडतात कारण रामायणात दिलेल्या शिकवणी त्रिकालाबाधित आहेत. किंबहुना आजच्या काळात तर यांचे महत्त्व सर्वाधिक लागू आहे.
आजच्या या काळात, जिथे सख्खे भाऊ आपापसात मालमत्तेसाठी भांडतात, त्यांनी केवळ एकदातरी भरतभेट, वनवासात लक्ष्मणाने रामाला दिलेली साथ हे असे प्रसंग आठवावे. रामायण वाचताना कितीतरी वेळा राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे सावत्र भाऊ होते याचा विसर पडतो. किमान यांची चरित्रे आठवून तरी आपल्या मनातल्या मोहाच्या, द्वेषाच्या, स्वार्थाच्या भावना नष्ट व्हाव्यात. रामसेतू बांधताना छोट्याशा खारीने जर आत्मविश्वासाने सेतू बांधायला मदत केली नसती तर प्रत्यक्ष प्रभूचा स्पर्श तिला कधीच झाला नसता. तसेच आपल्या हातून फार मोठी कार्ये घडतीलच असे नाही, पण आपल्या कुवतीनुसार महान कार्यात हातभार तरी आपण लावू शकतो. जटायू सुद्धा सीता माईला वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढला. जटायूमुळेच तर रामलक्षणांना कळले की सीता माईला रावण घेऊन गेला आहे. आपल्या छोट्याशा सहभागाने काही फरक पडत नाही असे समजू नये. आज आपल्यात आपल्या देशासाठी सीमेवर जाऊन लढण्याची धडाडी नसेलही पण तरी आपल्या सगळ्या कला, गुण आणि बुद्धी देशाच्या प्रगतीसाठी वापरून, एक उत्तम नागरिक होऊन, जमेल तितकी समाजाची सेवा करून सुद्धा आपण देशभक्ती करू शकतो.
आपल्या आजूबाजूला आपले कान भरायला टपलेल्या अनेक मंथरा वावरत आहेत. हल्ली तर प्रभू श्रीरामांविषयी सुद्धा उलट सुलट बोलणारे लोक आहेत. पण अशा लोकांचा आपल्यावर परिणाम होऊ दिला तर आपल्यालाही कैकयी सारखा पश्चातापच पदरी पडणार आहे. एकमेकांना सुखदुःखात साथ देणे काय असते ते राम, लक्ष्मण, सीता यांच्याकडून शिकावे. आजच्या या जगात जिथे नाती क्षुल्लक गोष्टींवरून तकलादू होत चाललेली आहेत, तुटत चाललेली आहेत, तिथे राम सीतेचे निर्मळ, घट्ट नाते व निस्वार्थी प्रेम आठवावे. हव्यासाची वृत्ती बोकाळत असलेल्या या जगात रामायणातील घेण्यासारखी सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे त्याग. जिथे आपल्या सावत्र आईच्या सांगण्यावरून पितृवचन पाळण्यासाठी श्रीरामाने राज्याचा त्याग केला, जिथे क्षणभरही विचार न करता सीतेने राजवाड्यातील आरामदायी, ऐश्वर्यपूर्ण आयुष्याचा त्याग केला, तिथे समाजहितासाठी, कुटुंबासाठी आपण छोटे छोटे त्याग सुद्धा करू शकत नाही का?
प्रभू श्रीरामांनी समुद्राने त्यांना लंकेला जायला रस्ता द्यावा यासाठी तीन दिवस ध्यान केले. पण तरीही रस्ता न दिल्यामुळे शेवटी त्यांनी भात्यातून बाण काढलाच. विनयशीलता कुठे दाखवायची व क्रोधाचा योग्य वापर कुठे करायचा हे या गोष्टीतून अगदी स्पष्ट होते. सकारात्मक भावनेने, पूर्ण निष्ठेने कुठलेही कार्य कसे चोख पार पाडायचे ते मारुती राया आपल्याला शिकवतो. काम पूर्ण करण्यासाठी योग्य मार्ग सापडत नसलेल्या कुठल्याही माणसाने मारुती रायाची कोणतीही गोष्ट आठवली तर ते काम पूर्णत्वास नेण्याची प्रेरणा त्याला मिळेल. बिभीषणाची गोष्ट आपल्याला सतत या गोष्टीची आठवण करून देत राहते की जे अयोग्य आहे ते अयोग्यच राहणार; मग ते आपल्या जवळच्या माणसांनी का केले असेना. आणि ते स्वीकारून आपल्या माणसांना ते समजावून सांगण्याचे धाडस आपल्यात हवे. तसेच धर्म आणि अधर्म हे दोन पर्याय नेहमी आपल्या समोर असतात. आपण काय निवडतो त्यावरून इतिहास आपल्याला लक्षात ठेवतो.
'रामो विग्रहवान् धर्मः'
अर्थात श्रीराम साक्षात धर्म आहेत.
श्रीरामाचे जीवन हे आदर्श जीवन आहे. या मर्यादापुरुषोत्तमाने ज्याप्रकारे आपल्या जीवनात निर्णय घेतले त्याच्याशी आपले निर्णय आपल्याला सतत पडताळून बघायला हवेत. प्रत्येक माणसाने जर हे केले तर समाज व कुटुंबे कितीतरी प्रमाणात सुधारतील. आजकाल जिथे अनीती, खोटारडेपणा, चोऱ्या, विश्वासघात, लबाडी, अन्याय यांसारख्या वृत्ती फोफावत चाललेल्या आहेत तिथे सरळ रस्त्याने जाणाऱ्या माणसांना खचून गेल्या सारखे होते. पण अतिशय कठीण प्रसंग ओढवलेले असताना ही कधीही धर्ममार्ग सोडण्याचा विचारही ज्यांना शिवला नाही, असे राम सीता आपले आधारस्तंभ आहेत. जिजामातांनी शिवाजी महाराजांना रामायणातील गोष्टी सांगून घडवले व धर्माचे धडे दिले. रामायणात सत्याची, धर्माची, पवित्रतेची शक्ती आहे. रामायणातल्या प्रत्येक गोष्टीतून अनेक धडे घेण्यासारखे आहेत त्यामुळे आजच्या पिढीला या गोष्टी आजच्या काळाशी जोडून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकांचे जीवन बदलण्याची शक्ती रामायणात आहे आणि म्हणूनच असे म्हटलेले आहे -
यावत् स्थास्यन्ति गिरयस्सरितश्च महीतले ।
तावद्रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ॥
जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत आहेत व नद्या वाहत आहेत, तोपर्यंत रामायणाची कथा लोकप्रिय राहील.
जय सिया राम
- अजिनधरा मंदार आठलेकर (८४५२८०८७६०)
ajindharaathalekar02viiie@gmail.com