।। जय श्रीराम ।।
'आजच्या काळातील रामकथेचे महत्त्व'
रामो राजमणिः सदा विजयते रामो रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः ।
रामान्त्रास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुध्दर ।।
या श्लोकातून प्रभू श्रीराम रायाचे महत्व वर्णन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामांचा जीवनप्रवास म्हणजेच मार्ग अयन म्हणून रामायण होय. या जीवन प्रवासात प्रत्येक वळणावर आदर्श घेण्यासारखं आहे. रामायणातील प्रत्येक पात्र यांचा आपण अभ्यास जर केला तर प्रत्येक पात्रातून आदर्श गुण घेण्यासारखे आहेत.
आजच्या काळात युगामध्ये राम कथेचे तितकेच महत्त्व प्राप्त झालेले आहे रामायण घडून आज अनेक वर्ष झाली असली तरी तितक्याच गोडीने आज देखील आपण रामायण श्रवण करतो. खरोखरच; आजच्या काळामध्ये रामायणातील आदर्श गोष्टी घेण्यासारख्या आहेत. रामायणातील प्रत्येक पैलूचा, पात्राचा, घटनेचा विचार केला असता आजच्या काळसाठी गरजेच्या आहे. मनाला कुठेतरी खंत वाटते की; आजच्या युगामध्ये जर या आदर्श गोष्टी प्रत्येक व्यक्तीने अंगभूत केल्या तर ही समाजव्यवस्था किती सुंदर होईल.
रामायणातील बंधूचे प्रेम ही काळाची गरज आहे. भावाने भावासाठी केलेला त्याग, समर्पण हे राम आणि लक्ष्मण या भावांच्या जोडीने आपल्याला दाखवून दिले आहे. प्रभू श्रीराम वनवासाला जाताना लक्ष्मणाच्या निर्णयाविरोधात उर्मिलाने जो त्याग दाखवला तो अत्यंत कौतुकास्पद आहे एक नाही तर 14 वर्ष पती प्रेमासाठी विरक्त राहणे हे सोपे नाही तरी देखील केवळ आणि केवळ कुटुंबासाठी पती प्रेमासाठी पतीचा निर्णय मान्य करणे हे कठीण काम आहे. आजच्या काळात ही उर्मिलाने दाखवलेले वृत्ती एकत्र कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
सीतेचे रावणाकडून हरण झाले असता सुग्रीव यांनी सीतेचे दागिने दिल्यानंतर प्रभू श्रीराम यांनी लक्ष्मणाला प्रत्येक दागिना दाखवला असता केवळ फक्त सीतामाईचे पैंजण मी ओळखतो असे लक्ष्मण म्हणाले;
नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले।
नुपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात्।।
यावरून स्त्रीकडे किती आदराने पाहिले जाते आणि मोठ्या भावजयीला मातेचे स्थान दिले जाते हे खरोखरच आजच्या काळामध्ये नितांत गरज आहे. आज स्त्रियांकडे वाईट दृष्टीने पाहिले जाते त्यांच्यासाठी लक्ष्मणाचे हे सुभाषित किती आदर्शस्पद आहे. लक्ष्मण या रामायणातील पात्राद्वारे आजच्या समाजाला बंधुप्रेम, त्याग, समर्पण, स्त्रियांकडे बघण्याचा आदर या गोष्टी शिकण्यास मिळतात.
रामायणातील कैकयीने आपल्या स्वतःच्या मुलासाठी प्रभू श्रीरामास वनवासाला पाठवले परंतु; हे जेव्हा भरतास समजले तेव्हा त्यांनी प्रभू श्रीरामांची भेट घेऊन त्यांच्या पादुका गादीवर ठेवून राज्यकारभार करण्याचे ठरवले तसेच वनवास पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ताबडतोब आयोध्येमध्ये परत या परत येण्यास उशीर झाला असता मी स्वतः चितेमध्ये प्रवेश करील असे भरताने प्रभू श्रीरामांना म्हटले तसेच केवळ आपल्यामुळे प्रभू श्रीरामांना 14 वर्ष वनवास करावा लागणार आहे त्यामुळे आपण स्वतः देखील राजवाड्याचा उपभोग घ्यायचा नाही असे भरत यांनी ठरवले. या घटनेतून बंधुप्रेम बंधुसाठी असणारी त्यागी वृत्ती खरोखरच आजच्या काळात याची नितांत गरज आहे.
रामायणातील हनुमानाच्या पात्राचा जर आपण विचार केला तर खरोखर या पात्रातून स्वामीविषयीची आस्था प्रेम दिसून येते. आपले संपूर्ण आयुष्य स्वामीची सेवा करण्याचे हनुमानाने ठरवले. यावरून आपण स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठी आपला देह झिजवावा हेच दिसून येते म्हणूनच "परोपकारार्थ इदं शरीरम्" असे म्हटले आहे. रावणा सोबत युद्ध खेळताना प्रभू श्रीरामांना अनेक पशुंची मदत झाली यावरून निसर्गातील मानव आणि पशु यांचे किती सौख्याचे संबंध होते हे दिसून येते याची देखील आजच्या काळात नितांत गरज आहे.
प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यात जे युद्ध झाले त्या युद्धामध्ये प्रभू श्रीरामांचा विजय झाल्यानंतर बिभिशन यांनी आपण लंकेचे राजे व्हा असे प्रभू रामरायांना म्हटल्यानंतर प्रभू रामरायांनी असे सांगितले;
अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी।
प्रभू श्रीरामांनी आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे असे सांगितले. यावरून आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी शेवटी आपण आई आणि आपली जन्मभूमी यांचाच विचार केला पाहिजे हेच यातून लक्षात येते. सध्याच्या काळामध्ये हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
रामायणातील प्रत्येक पैलूंचा पात्रांचा आपण बारकाईने जर अभ्यास केला तर आपल्याला फक्त आणि फक्त चांगले आदर्श गुणच मिळतील जे की सध्याच्या युगामध्ये परिस्थितीमध्ये घेण्यासारखे आहेत. सध्याच्या युगामध्ये सामाजिक परिस्थितीत स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी, कौटुंबिक कलह, कुटुंबातील भावा भावा मधील होणारा संघर्ष या सर्व समस्यांसाठी तसेच समाजामध्ये अनेक निर्माण होणाऱ्या समस्यांसाठी राम कथेचे महत्व अनन्यसाधारण आहे कारण; या रामकथेकडुन जर प्रत्येकाने आदर्श गुण घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आजची समाज व्यवस्था ही त्या काळजी रामराज्या सारखी सुखी होईल. आज देखील तितक्याच प्रेमाने आपण राम कथा श्रवण करतो कारण ब्रह्मदेवानेच या रामायणाला असा वर देण्यात आला आहे की;
यावत्स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महितले ।
तावद्रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ।।